Tandem Ride

टँडेम राईड

फेसबुक वर सायक्लोप नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपवर माझा नवरा श्रीनिवास बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. सायकल ऍडिक्ट तर तो आहेच. त्यात या ग्रुप मधून आणखी ओळखी होऊन नवीन नवीन आयडिया त्याला मिळत असतात. याच ग्रुप वर एक कपल आहे त्यांचं नाव आहे सनथ रथ आणि प्रतिमा मिश्रा.  या दोघांनी टँडेम सायकल घेऊन त्याचे फोटो ग्रुप वर टाकले नि आमच्या साहेबाच्या डोक्यात पण किडा वळवळला. थोड्याच दिवसात प्रॅक्टिसने त्या दोघांनी २०० किमी ची BRM पूर्ण केली.

मग तर आमचे साहेब आणखीनच अस्वस्थ झाले. हळूहळू मनातली वाक्य ओठावर यायला लागली. सनथशी श्रीनिवास पूर्वीपासूनच कॉन्टॅक्टमध्ये होता. त्यांची बरीच चर्चा वेगवेगळ्या बाबतीत होत असे. एकदा हळूच त्याने विचारलंन,’आपण पण घेऊया ?’ आणि मी जराही वेळ न दवडता नकार देऊन मोकळी. घरात तिघांच्या तीन सायकली. माझी सायकल फक्त सणावाराला बाहेर पडते. आणखी कशाला हवेय दुसरी सायकल?  त्यात ती टँडेम बाईक. म्हणजे इथे सिंगल सायकल चालवायला मुहूर्त शोधायला लागतो तर हि डबल सायकल कधी बाहेर पडणार? एक ना दोन मी हजार कारण त्याच्यासमोर ठेवून नकार दिला. मध्ये काही दिवस गेल्यावर श्रीनिवासने परत एकदा विचारलंन कि किंमत फार जास्त नाहीये. घेऊया ना? दोघांनी एकदम जायला बरं पडेल. थोडे कष्ट कमी होतील. आणि काय नि काय. जेव्हढी कारणं मी सायकल न घेण्यासाठी दिली तेव्हढीच कारणं श्रीनिवासने ती सायकल घेतल्याने कशी फायदेशीर होईल याची दिली. शेवटी काही नाही तर ईशानला आपल्याबरोबर लॉन्ग राईडला नेता येईल या कारणाखाली त्याने मला सायकलसाठी होकार द्यायला भाग पाडलंन.

आमच्या चिपळूणच्या सायकलवाल्याशी बोलून सायकल Raleign Tandem  मागवून घेतली. ती सायकल खोक्यातून काढून जोडण्यापर्यंत सगळं श्रीनिवासने स्वतःच्या देखरेखेखाली करून घेतलंन. एकदाची सायकल तयार झाली. आम्ही दोघांनी ती सायकल चिपळूण ते खडपोली १०किमी चालवत आणली. तेव्हा एकदम छान चालली. या पहिल्या वेळी श्रीनिवास पुढे नि मी पाठी असे आम्ही आलो.

Raleigh Tandem – https://www.suncrossbikes.com/bike.php?type=1&b_id=0&id=559

हि सायकल दोघांनी मिळून चालवायची सायकल असते. चाकं दोनच पण पॅडल मात्र दोघांनी मारण्याकरता चार.  चालवताना दोघांनी एकदम पॅडल मारणं गरजेचं असत. दोघांचा ताळमेळ योग्य साधणं हे यातलं कौशल्य. एकाने अचानक पॅडल मारणं थांबवलं तर दुसर्याला छोटासा का होईना धक्का बसल्यासारखं होतं. थांबायचं असल्यास आधी सूचना देऊन, सुरवात करताना पण एकमेकाला सांगून, समोर खड्डा आला तर ब्रेक दाबताना पण सांगून, असं सगळं एकमेकाला सांभाळून करावं लागतं. एक दोन वेळा जवळपासच्या राईड झाल्यावर आम्हा जरा सवय झाली नि एक मोठी राईड करायचं ठरवलं. मागच्या वेळी आम्ही आपापल्या सायकली घेऊन माझ्या माहेरी ३५ किमी जाऊन आलो. आता हि टँडेम घेऊन जायचा प्लॅन केला.

शनिवारी १२ तारखेला सकाळी ५ला  उठून तयारी करून बरोबर ६ ला निघालो. दुर्दैवाने आमचा खडपोली चिपळूण हा राज्य महामार्ग नवीन कामाकरिता मिळेल त्या ठिकाणी खणून ठेवल्याने या रस्त्याची फारच भयानकअवस्था आहे. त्यात थंडीचे दिवस असल्याने ६ वाजता सुद्धा अंधार होता. सायकलला लावलेल्या बॅटरीच्या प्रकाशात कसेबसे चिपळूणला पोहचलो. तोवर थोडं उजाडलं होत. पण तरीही पुढे घाट असेल नि धुके असेल म्हणून बॅटरीचा ब्लिंकर चालू ठेवला. थोड्याच वेळात कामथे घाटाला लागलो. साधारण ५किमीचा हा घाट. पण चढ हे ग्रॅजुएल असल्याने चढणं चालू होत. मागच्या वेळी या घाटाने मला पूर्ण दमवून टाकून मी अक्षरशः सायकल हातात घेऊन अर्धा अधिक घाट चालत चढले होते. त्या आठवणी जाग्या झाल्या. पण आता दोघे जण नि सायकल एकच त्यामुळे चढण जरा सोपी वाटत होती. पूर्ण घाटात फक्त एकदा पाणी प्यायला थांबलो नि घाट पूर्ण केला. घाटात आम्हाला अपेक्षित असलेलं धुकं कुठेही लागलं नाही. घाट मस्त फुल्ल स्पीडला उतरून कोंडमळे गावाला सुरवात झाली  नि इतकं धुकं लागलं कि समोर अगदी ४ फुटावरचं देखील दिसायला तयार नाही.

घाट उतरताना असलेल्या स्पीडला ब्रेक लावायला लागला. त्यात समोर एस टी आम्हाला ओव्हरटेक करून गेली नि गचकन ब्रेक मारून स्टॉपवर थांबली. आम्हाला आमची काळजी असल्याने एस टी च्या पाठी सुरक्षित अंतर ठेवून आम्ही देखील थांबलो. एस टीला सावकाश पुढे जाऊ दिल नि मग आम्ही परत सुरवात केली. सावर्डा क्रॉस करून आगव्याची घाटी लागली. शार्प यु टर्न नि तीव्र चढ अशी हि घाटी . दोघांना बऱ्यापैकी जोर लावला लागला इथे. पण जमले. मग असुरड्याचा उतार नि पुढे असुरड्याची खिंड. ४/५ तीव्र चढाची वळणे नि मग उतार अशी याची रचना. इथेही अगदी शेवटच्या चढावर चांगलाच जोर लावायला लागला पण एकदा ते पार केल्यावर मग फक्त उतार एके उतार. अगदी घरापर्यंत. या वेळी चक्क २तास १५ मिनटात आम्ही ३५किमी पूर्ण करून ८,३० या घरी नाश्त्याला पोचलो.

मस्त पोटभरून नाश्ता, आलं घालून चहा झाल्यावर परत १० वाजता लगेच परतीचा प्रवास सुरु. हेच सगळे घाट उतरत्या क्रमाने चढून उतरून आम्ही परत १२. ३० ला घरी पोहोचलो. सगळ्या प्रवासात बोरिंग झाला असे तर तो आमचा चिपळूण खडपोली रस्ता. सध्याच्या या पॅचला रस्ता म्हणणे म्हणजे रस्ता शब्दाचा अपमान आहे. काम चालू असल्याने इतक्या ठिकाणी इतके खोदून ठेवलेय. मूळ रस्ता हाच मुळात खंदकानी भरलेला. त्यातला अर्धा रस्ता आता खणून ठेवलेला. येताना तर डोक्यावर ऊन तापत होत. खड्यांमुळे हातावर जोर येत होता. स्पीड तर सोडाच पण सायकल बॅलन्स करायलाही कठीण जात होती. एके ठिकाणी शेवटी सायकलने थकून पुढे  नकार दिला. सायकलची चेन उतरली. सुदैवाने श्रीनिवासला सगळं काम येत असल्याने लगेच दुरुस्त करून परत पॅडल मारायला सुरवात केली. एवढा वेळ असलेला उत्साह संपायला आला. एकदाचा खडखडाट संपला नि आम्ही घरी पोचलो. एकूण ७० किमी आम्ही साधारण ५ तासात पार केले.

या सगळ्या प्रवासात खूप मजा आली. इथल्या सगळ्यांनी जवळ जवळ पाहिल्यान्दाच असली सायकल बघितल्याने इतके आश्चर्याने बघत होते. शाळेत जाणारी मुले तर मोठ्य्याने ओरडून “ए ती बघ सायकल कसली मस्त आहे. भारीच आहे ना?” वगैरे उद्गार काढत एकमेकांचे लक्ष वेधत होती. आम्हाला मज्जा वाटत होती. काही मोठी माणसंदेखील अगदी जवळ येऊन चौकशी करून जात होती. किंमत किती आहे हा बहुतेकांचा जास्त कुतूहलाचा विषय होता. सायकल चालवायला खरंच मजा आली. दोघानाच्या ताकदीमुळे कष्ट तसे थोडे का होईना कमी होतात. गिअर बदलताना, सायकल चालवणे सुरु करताना, थांबवताना, ब्रेक दाबताना, अगदी एक हात पटकन सोडावासा वाटलं तरी बरोबरच्या माणसाला सूचना दिल्याशिवाय ते कारण शक्य होत नाही. नाहीतर बॅलन्स जायची शक्यता असते. हि सायकल लांबच्या लांब असल्याने वळवताना, यु टर्न घेताना सायकलचा अंदाज घेऊन जरा बाहेरूनच वळवावी लागते. दोघांचे सिंक्रोनायझेशन फारच महत्वाचे आहे. श्रीनिवास माझ्यापेक्षा उंच असल्याने आता मी पुढे नि तो पाठी बसतो. जेणेकरून दोघांनाही समोरचं  व्यवस्थित दिसेल. पण  एकूणच मजा आली. मी पाहिल्यान्दाच एवढे ७० किमी एका दिवसात तेही एवढ्या कमी वेळात पूर्ण केले. त्याबद्दल स्वतःवर खूपच खुश होते.

अशाप्रकारे आमची पहिली टँडेम राईड पूर्ण झाली. अशाच राईड करण्याचा यापुढे मानस आहे. तेव्हा भेटूच परत.

धनश्री

16-01-2019

34 thoughts on “Tandem Ride

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *