A Ride to Terav…

Entering Terav road…

मध्यंतरी सायकलिंग मध्ये चांगलाच खंड पडला होता. श्रीनिवासच्या पायाला दुखापत झाल्याने, मग पाऊस आला म्हणून जवळ जवळ ७/८ महिने सायकल घेऊन कुठे फिरायला गेलो नव्हतो. खरं तर चैन पडत नव्हतं पण आमचा सेनापतीच जिथे जायबंदी तिथे आम्हा मावळ्यात जोश कुठून येणार?

तशा टँडेम सायकलने जवळपासच्या २/३ फेऱ्या मारल्या पण समाधान नाही झालं. त्यातही ईशानला  माझ्या मुलाला (वय वर्ष ८ पूर्ण )आमच्या बरोबर नेता येत नाही. सगळा पावसाळा असा घालवून झाल्यावर शेवटी एकदाची मागच्या आठवड्यात श्रीनिवासची नवीन सायकल Lightspeed Rush https://lightspeed.bike/rush-high-performance-electric-bicycle/ घरी आली. स्वारी त्यामुळे भलतीच खुश होती हे वेगळं सांगायलाच नको. पायाला दुखापत झाल्याने यावेळची त्याची सायकल इलेक्ट्रिक असिस्ट अशी होती. सायकलला एक बॅटरी आहे, ती चार्ज करून लागेल तेव्हा सुरु करून आरामात जायचं. सरळ रस्त्यावर पॅडलिंग करायचं, चढ चढताना पायावर जास्त जोर येऊ नये म्हणून बॅटरी असिस्ट. पॅडलिंग चालूच ठेवायचं पण पायावर प्रेशर खूप कमी येत त्यामुळे. नवीन सायकलची छोटी राईड करून ट्रायल झाली होती पण जरा मोठ्या रस्त्यावर चढ उतारावर न्यायची होती.

 शिवाय आमचीही एकत्र अशी राईड बरेच दिवसात झाली नव्हती. मागच्या एका परशुराम च्या ३० किमी राईड नंतर ईशानला पण कुठे नेलं नव्हतं. त्यामुळे या रविवारी नक्की जायचं ठरलं.

रविवारची झोप सोडून बाहेर पडणे म्हणजे आम्हा दोघांसाठी मोठा त्याग आहे. 🙂 🙂 🙂 पण हौसेला मोल नाही नि सायकलवाल्याला झोप नाही असं म्हणून सकाळी ६ चा गजर पुढे ढकलत शेवटी ६. ४५ ला उठलो. मस्त धुकं पडलं होत. गरम गरम चहा हातात घेऊन  नुसतं बसावसं वाटत होतं. पण सायकलींगचा मोहसुद्धा आवारत नव्हता. शेवटी आळस झटकून उठलो. ईशानला देखील उठवून तयार केलं. आधी चिपळूणपर्यंतच जायचं ठरलं. खर तर घरापासून चिपळूण फक्त १० किमी आहे. जाऊन येऊन २० किमी. हे अंतर आता खूपच कमी वाटत. पण तरीही तयार झालोच आहोत तर चला नाश्ता तरी चिपळूणला करून  येऊ म्हणून निघालो. ईशान आणि श्रीनिवास मला केव्हाच मागे टाकून पुढे जातात. म्हणून श्रीनिवासची तयारी होईपर्यंत मी आधीच निघाले. ईशानला सांभाळून आणायचं काम अर्थातच श्रनिवासच त्यामुळे ते दोघे जरा पाठी रेंगाळले. मी ७किमी अंतर पार करून थांबले. अजून हे दिसेनात म्हणून फोन लावला. मग आलेच थोड्या वेळात. मधल्या वेळात श्रीनिवासने ईशानला काय पटवलं माहित नाही, पण अचानक जरा जास्त लांब राऊंड मारून येऊअसं ठरलं. चिपळूणला वैभव हॉटेलला भरपेट नाश्ता केला. आणि निघालो. चिपळूणपासून साधारण 7 ते 8 किमी अंतरावर टेरव नावाचं गाव आहे. तिथे सुंदर असं वाघजाई देवीचं मंदिर आहे. तिथे जाऊन दुसऱ्या रस्त्याने खेर्डीत बाहेर पडून खडपोलीला परत यायचं ठरलं. 

खडपोली – चिपळूण, चिपळूण – कामथे  हा सगळं जवळपास फ्लॅट रस्ता आहे. त्यामुळे हे अंतर सायकलने जायला काहीच कष्ट पडले नाहीत. कामथे गावातून टेरव गावात जायला फाटा फुटतो. आम्ही टेरव फाट्यावरून आत वळलो आणि मोठ्या अश्या बोर्डाने आमचं स्वागत केलं. तिथून टेरव फक्त 3 किमी. पण त्या बोर्डाच्या पाठी भला मोठा डोंगर आणि चढत जाणारा रस्ता आम्हाला भीती दाखवत होता. हर हर महादेव म्हणून जोशात सुरवात केली. पण अक्षरशः ५ मिनिटं पण पुरी केली नसतील नि दम निघाला माझा.

एरवी कधी न थकणारा आमचा छोटा चॅम्प देखील आज पायउतार झाला. इतका तीव्र चढ होता कि बास रे बास. खर तर या रस्त्याने आम्ही याआधीही अनेक वेळा गेलोय. पण गाडीतून जाताना वाटणारी मजा नि सायकलने जाताना लागणारा दम हे परस्पर विरोधी आहेत असं जाणवलं. मी नि ईशान हार पत्करून सायकल हातात धरून पायी चढ चढायला लागलो. श्रीनिवास त्याच्या नवीन सायकलने निवांतपणे चढ चढून थांबत होता. पाणी पीत, दम खात, मध्येच थांबत आता तरी संपेल, आता तरी संपेल करीत चढ चढत होतो. जवळपास प्रत्येक वळणावर आता हे समोर दिसणार वळण झालं कि आलंच टेरव असं वाटत होत. पण काही केल्या ते गाव काही येत नव्हतं. नवरात्र असल्याने देवळात जायला गाड्या येत जात होत्या. येणारे जाणारे विचित्र नजरेने बघत होते, पण आता सवय झालेय त्याची.  

Tired...
Tired…..
Kamthe Dam backwater on the right corner and circular climb that we just completed in the foreground…
After the climb.. ek selfie to banta hain!

जवळपास पाऊण चढ चढून झाल्यावर एक माणूस अतिशय आपुलकीने गाडी थांबवून चौकशी करून गेला त्यांच नाव श्री शरदराव कदम ! शरदरावांनी त्यांच्याकडे यायचंच असं आमंत्रण दिलं. घरी यायचा आग्रह केला होता. श्रीनिवास त्यांच्याशी बोलून होईतो आम्ही एक छोटीशी विश्रांती घेतली. परत एका सपाट रस्ता आला म्हणून सायकल चालवायला सुरवात केली

Its not about the destination, its all about the route we take!

पण परत ५ मिनिटं झाली नि मोठा चढ आला. “देवी आई संपव हे चढ आता !“असं मनातल्या मनात म्हटलं आणि काय आश्चर्य संपले कि चढ.:) तो शेवटचाच चढ होता मग पूर्ण गाव सपाट होत. टेरव गाव एकदम डोंगराच्या टोकावर आहे. चढाच्या एकदम टोकावर गेल्यावर सुंदर असं दृश्य नजरेस पडलं . डाव्या बाजूला कामथे घाटातले टॉवर तर समोरच्या बाजूला कामथे धरणाचा तलाव. सगळीकडे हिरवळ नुसती गच्च भरून होती. निसर्गाचं हे रूप मला प्रचंड आवडतं. निळंशार आकाश, मधूनच डोकावणारा एखादा ढग आणि खाली पसरलेले हिरवेगार डोंगर. बस! मन प्रसन्न झालं नि एवढा मोठा चढ चढून आल्याचं समाधान झालं .

मगाशी भेटलेल्या गृहस्थांचं नाव शरदराव कदम होत. शरदरावांनी अतिशय आपुलकीने त्यांच्याकडे यायचंच असं आमंत्रण दिलं. शरदराव एकदम दिलखुलास माणूस. त्यांच्याशी मस्त गप्पा झाल्या आणिशरदरावांची वाडी http://www.kokanconnect.com/listing/sharadraonchi-wadi-agro-torism/ नावाने ते एक छोटंसं रिसॉर्ट सारखं develop करत आहेत. त्यांच्याकडे जरा निवांत गप्पा नि कोकम सरबत झालं. त्यांची वाडी बघितली फिरून.

Shri Sharadrao Kadam @ Terav

मग निघालो 11.30 वाजले होते. सूर्य बरोबर डोक्यावर आला होता. पण आता चिंता नव्हती. इथून खेर्डी फक्त ५किमी आणि तेही पूर्ण उतार. मग काय? एरवी श्रीनिवास नि ईशानच्या मागे असणारी मी इथे फुल्ल जोशात त्यांच्या पुढे. रस्ता चांगला असलयाने उताराची मस्त मजा घेता आली. ब्रेक दाबत सगळा उतार  उतरून आलो अर्थात श्रीनिवास, ईशान बरोबर त्याला कंट्रोल करत येत होता. खेर्डीत आल्यावर मग परत रोजचाच रस्ता. मी दोघांना पाठी टाकून पुढे आले. मागे वळून दोघे दिसेनात. पण आता घर गाठायची घाई झाली होती. ऊन तापत होत. शिवाय ईशान बरोबर श्रीनिवास असल्याने चिंतेचं कारण नव्हतं. मी आपली माझ्याच नादात घरापर्यंत आले. माझ्या मागून १५ मिनिटं झाली तरी दोघे आले नाहीत म्हणून फोन केला. तर बिचार्या ईशानच्या सायकलची चेन ३ वेळा उतरली. मग त्यांचा वेळ गेला.

प्रत्येक राईडच्या वेळी कायम येणाराअनुभव म्हणजे लोकांचे विचित्र बघणे. त्यातही एक बाई सायकल चालवते म्हटल्यावर हमखास अशी नजर आता परिचयाची झाली आहे. आज देखील मी सकाळी पुढे जाऊन दोघांची वाट बघत थांबले असताना कितीतरी पुरुष विचित्र नजरेने बघत, तर कधी कोणी अगदी न्याहाळत गेले. मुद्दाम हॉर्न वाजवणारे तर कित्येक. हाच अनुभव आम्ही टेरवचा चढ चढत असताना देखील आला. फक्त या वेळी मी एकटी नसून मुलगा बरोबर होता त्यामुळे कुतूहलाचा विषय तो होता. वळून बघणारे बरेच असतात. बरोबर श्रीनिवास असेल तर हॉर्न वाजवणाऱ्यांची संख्या चांगलीच कमी होते, हे देखील एक निरीक्षण.  

असो, आज बरेच दिवसानंतर छान राईड झाली. भटक्या खेडवाले काका नवीन नवीन ठिकाणी दर आठवड्याला जाऊन आम्हाला जळवत होते. दर आठवड्याला नवीन राईड नवीन फोटो. चला आज मला पण समाधान झालं कि त्यांच्याएवढी मोठी  नाही निदान ३०किमीची तरी राईड झाली. मन प्रसन्न झालं. आता परत सुरवात झाली. पाऊस पण कमी होतोय. दिवाळीची सुट्टी खुणावतेय. बघूया पुढे काय जमतंय ते…..

DhanaShinivas

Final Count in terms of distance covered…

37 thoughts on “A Ride to Terav…

 • खूपच छान वर्णन. Keep it up.
  तुम्हा तिघांनाही खूप खूप शुभेच्छा.

 • मस्त लिहिलंय. तुम्ही सगळेजण सायकलिंग एन्जॉय करता हे चांगलं आहे. फोटो मस्तच! अशा अनेक राईड करण्यासाठी शुभेच्छा!

 • छान लिहिताय…
  छोटे छोटे करत, असेच मोठे अनुभव जोडत चला…

  बादवे,
  खादाडी नाय, तर राईड नाय…
  😉

 • मस्त राईड आणि वर्णन, मी बायको आणि अविक असेच जातो राईड ला, त्यामुळे ही फॅमिली राईड आवडली। पुढील सर्वं मोहिमेकरता शुभेच्छा!

 • खूप छान… हे वाचुन दसऱ्याला सीमोल्लंघन करावं म्हणतोय👍

 • प्रचंड आवडला लेख भावा…
  सर्वात जास्त कौतुक छोटया ना..ना….मोठ्याना लाजवेल अश्या तुमच्या लेकाचे…आणि तुम्ही तर भारी आहातच हो.
  सुंदर अश्या राईडला अशी सुरेख लेखनशैली मिळाली की वाचनाचा आनंद पण द्विगुणित होतो.
  अखंड शुभेच्छा..

 • अरे मस्तच. पुढच्या रविवारि ट्रेक ठरला नाहि तर नेचल, दत्तधाम करुया नक्कि.

 • वाह मस्तच. बायकोसाठी सायकल घेण्याचा विचार आणखी पक्का झाला आता. ज्युनिअर गोड आहे तुमचा.

 • सुंदर वर्णन,
  तुमच्या या भटकंतीच्या प्रेमापोटी मला नेहमीच नवीन जागा त्याचबरोबर माहिती नसणाऱ्या सायकली बद्दल ज्ञान मिळते.
  खुप शुभेच्छा, आणि इशानचे खुप कौतुक

 • कोणताही आनंद एकट्यानेच उपभोगणे म्हणजे स्वार्थीपणा, पण कुटुंबासोबत आनंद, मजा करणे म्हणजे सुखाच्या दुनियेतला एक टप्पा पूर्ण करण्यासारखे आहे.
  खूप छान लगे रहो.

 • धनश्री, सायकल सफरीचे मस्त वर्णन ! अशाच सफरी करत रहा. तुम्हाला खूप शुभेच्छा!!

 • फारच सुंदर ट्रिप . अशीच भटकंती द करत रहा. मी पण १५ दिवसापूर्वी माझी साधी सायकल ५ गियर नि सुसज्ज केली. धायरी ते पर्सिस्टन्ट ऑफिस व परत अशी ट्रिप मारली.:-)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *