लोकांच्या भयानक पाककॄतींचे ’गिनिपिग’ होण्यापासून कसे वाचावे?

               आजकाल सगळ्या दूरदर्शन वाहिन्यांवर नवनवीन (भयानक) खाद्यपदार्थ कसे बनवावेत याचंच एक वेड आलं आहे. आपण कधी कुठे नातेवाईकांकडे जातो आणि नेमका त्यांच्या घरी कांहीतरी खाद्य पदार्थ बनवून खायला दिला जातो (आपल्याला अगदी गिनिपिग झाल्यासारखं वाटतं) आणि आपल्याला तो पदार्थ आवडत नसेल तरी तो किती चांगला आहे याचं महत्व पटवून देण्याची त्या घरातल्या लोकांमधे चढाओढ लागते. मग, लोक काय वाट्टेलती कारणं देतात आणि आपण शेवटी “भिक नको पण, कुत्रा आवर” या म्हणीला जागुन तो पदार्थ चाखून पाहतो (चविष्ट नसतोच म्हणून कसाबसा गिळून टाकतो) आणि (झकमारत) तोंडावर जमतील तेव्हढॆ चांगले भाव आणून “वा! वा!” करायचा प्रयत्न करतो आणि इथेच फ़सतो कारण आपल्या डीश मधे अजून पदार्थ वाढला जातो.  


  या अत्याचारापासून कसं वाचायचं यावर विचार करत असतांना एक मस्त कल्पना सुचली आणि ती गेले कांही दिवस खूपच उपयुक्त ठरते आहे. कधी कुठे गेलो आणि त्या घरातली माऊली आणि इतर मंडळी आग्रह करुन एखादा पदार्थ (जो मला आवडत नाही) खाऊन बघायचा आग्रह करायला लागले की, मी पदार्थ बघतो, अगदीच वेगळा आणि छान दिसत असेल तर थोडासा चाखून बघतो आणि खरंच चांगला झाला असेल तर माझं प्रांजल मत व्यक्त करतो (चांगला झाला असेल तर चांगला झाला आहे असं सांगतो आणि नाही आवडला तर नाही म्ह्णून सांगतो) 
     
               आता, मला तो आवडला नसेल आणि तरीही खाण्याचा आग्रह होत असेल तर मी त्यांना सांगतो “मला तुमचं म्हणणं अगदी पटतंय! या पदार्थासारखा पदार्थ इथेच काय या भूतलावर मिळणे शक्य नाहिए आणि हा पदार्थ म्हणजे जगातला एक नंबरचा पदार्थ आहे! पण, समस्या अशी आहे की, तो पदार्थ मला आवडलेला नाही!” 🙂


असं म्हटलं की, लोकांचे चेहरे बघण्यासारखे होतात आणि ते जास्त आग्रह करायच्या भानगडीत पडत नाहीत.

मनातल्या मनात शिव्या घालत असतील पण, आपली सुटका होते हे महत्वाचं…  


आणि ही कल्पना खरंच लागू पडते आहे. नक्की प्रयत्न करा….

0 thoughts on “लोकांच्या भयानक पाककॄतींचे ’गिनिपिग’ होण्यापासून कसे वाचावे?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *