यूं ही चला चल राही….

श्रीनिवास, माझा नवरा, सुरवातीला ट्रेकिंग करायचा. आता त्याला सायकलिंगचा नाद लागलाय. इतकाकि मी कधी कधी त्याला सायकल वेडा म्हणते. एरवी दोघांमध्ये मीच जास्त बडबड करणारी. पण सायकलचा विषय निघाला कि श्रीनिवास एकदा जो सुरु होतो तो थांबतच नाही. कधीतरी मी सांगतेसुद्धाकि बास बाबाआता सायकल पुराण. पण तो थांबत नाही. आपण सायकलने इकडे जाऊया, मग तिथून दुसरीकडे जाऊया असे प्लॅन अखंड करत असतो. यातल्या बऱ्याच वेळेला मी दुर्लक्ष करते कारण माझ्याच्याने ते झेपणार नाही याची मला खात्री असते.  श्रीनिवास सायकलची फारच काळजी घेतो. कोणाला उगाच तिला चालवू देणार नाही, कुठेतरी तिला उभे करणार नाही, तीच सर्विसिन्ग वेळेवर करून घेईल, तिच्यासाठी अथवा तिच्याबरोबर लागणाऱ्या सगळ्या गोष्टी विकत घेताना कधीही मागेपुढे पाहणार नाही. डेकॅथलॉन म्हणजे तर त्याची आवडती जागा. लॉटरी लागली तर हे साहेब सगळे पैसे तिथेच उडवून येतील. आता असं असताना का बरं मला तिच्याविषयी असूया वाटणार नाही? पण आता हळूहळू मला देखील सायलकलिंग मध्ये त्याने ओढून आणलाय. आणि हळूहळू का होईना पण मी सायकलिंग करायला लागलेय.

या आधी श्रीनिवासला कबूल केल्याप्रमाणे मी माझ्या माहेरी अर्थात खेरशेतला सायकलने जाऊन आलो. जाऊन येऊन ७० किमी अंतर कापून झालं.  मी स्वतः यावर समाधानी होते. खडपोली – खेरशेत राईडसाठी माझ्या मैत्रिणीची फायरफॉक्स कर्मा सायकल नेली होती. मला नक्की जमतंय कि नाही याची शाश्वती नव्हती पण, एकदा केल्यावर उत्साह आला. सायकलने राईड करण्याचं प्रॉमिस मी पूर्ण केलं होतं.  आता श्रीनिवासची टर्न होती त्याचं प्रॉमिस पूर्ण करण्याचं. कबूल केल्याप्रमाणे पुढच्याच रविवारी कोल्हापूरला जाऊन माझ्यासाठी नवीकोरी मॉन्टरा ट्रान्स विकत घेऊन आलो. दिवाळीच्या सुट्टीत कुठे जायचं याचा टेंटेटिव्ह प्लॅन झाला होता. त्याप्रमाणे नवीन सायकल आल्यावर जवळच अलोरे शिरगाव असं साधारण १३/१४ किमीच्या अंतरावर छोट्या मोठ्या चढ उत्तरांची प्रॅक्टिस चालू केली. हळू हळू गियरची अडजस्टमेन्ट समजून घेऊन चढात कोणते गियर टाकायचे, उतारात कोणते गियर टाकायचे, गियर वर सायकल कशी कंट्रोल करायची याची हळूहळू कल्पना आली. सायकलला माझी नि मला सायकलची सवय होऊ लागली.

दिवाळीच्या पहिल्याच दिवशी धनत्रयोदशीला इथून परशुरामला जाऊन आलो. सोबत ईशान देखील होताच. जाऊन येऊन ३२किमी अंतर झाले. यात परशुरामचा माझ्या दृष्टीने मोठा घाट होता. फक्त ३ किमी असलेला हा घाट चांगलाच दमवतो. माझ्यासारखीला तर अजूनच. खालून वर बघून साधारण उंचीचा अंदाज आला कि मी आधी मनाने खाली जाते. डोंगराच्या टोकाला कुठवर चढून जायचंय याचा अंदाज आता साधारण मोबाईल टॉवर बघून लक्षात यायला लागलाय. त्यामुळे मी आधीच जमणार नाही म्हणायला लागले कि श्रीनिवासच लेक्चर सुरु होतं. “जमणार नाही असं काही नसतं. हे सगळं मानसिक असतं. तुम्ही ठरवलं तर तुम्ही काहीही करू शकता. you can stretch your body as much as you want.” त्यामुळे यावेळी मी परशुराम घाट थांबत थांबत का होईना पण सायकलने चढले. घरून सकाळी 0७.00 ला निघून आम्ही 0८.१० ला परशुरामला पोहोचलो. सकाळी मस्त धुकं पडलं होत त्यामुळे उन्हाचा त्रास नाही झाला. परशुराम गावात आत न जाता हायवेवरच्याच शिवसागरमध्ये नाश्ता केला नि परत फिरलो. १०.३० पर्यंत घरी देखील पोहोचलो. हि सायकल राईड माझ्यासाठी अजून जास्त उत्साहाची ठरली कारण यावेळी मला घाट सायकलने चढता आला.

श्रीनिवासने सुट्टीचा प्लॅन आधीच ठरवला होता. खडपोली -चिपळूण – खेड – दापोली -कोळथरे – दाभोळ – वेलदूर – गुहागर  – वेळणेश्वर  – चिपळूण – खडपोली असा रूट ठरला. साधारण ५०किमी रोजचे सायकलिंग करायचे असे ठरवले होते. त्याप्रमाणे खेड, कोळथरे, वेळणेश्वर मुक्काम करून घरी परत यायचा प्लॅन ठरला. पण मग अचानक श्रीनिवासच्या डोक्यात काय आले माहित नाही, तो म्हणाला आपण पहिल्या दिवशी डायरेक्ट कोळथरे गाठूया. मला कल्पनेनेच घाम फुटला. खडपोली – कोळथरे गुगल मॅप ८८किमी दाखवत होता. एवढ़े एका दिवसात पार करायचं? माझा नाहीचा पाढा सुरु झाला. पण श्रीनिवासने हट्ट सोडला नाही. त्यातला त्यात थोडे कमी कष्ट म्हणून आम्ही खडपोली चिपळूण १०किमी आदल्या दिवशीच करून माझ्या भावाकडे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे भाऊबीजेच्या दिवशी संध्याकाळी ७ वाजता माझ्या भावाकडे सुमंताकडे पोहोचलो. चला मी तेव्हढीच उद्याचे १०किमी कमी झाले म्हणून खुश!

10th November, 2018

दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडली. आम्ही ४.३० ला उठून तयार होऊन ठरल्याप्रमाणे ५. ३० ला सुमंताचं घर सोडलं.

थंडी नसली तरी हवेत थोडा गारवा होता. चिपळूणहून बाजारपेठेतून रस्ता जातो तो डायरेक्ट मुंबई – गोवा हायवेला परशुराम घाटाच्या पायथ्याशी पोचतो. सुमंता आम्हाला तिथपर्यंत सोडायला आला. त्याला बाय करून आम्ही घाट चढायला सुरवात केली. अजूनही सगळीकडे काळोख होता. डोक्यावर हेडलाईट्स होते. सायकलला ब्लिंकर लावलेले होते. तरीही प्रचंड धुके त्या हेडलाईटच्या मध्ये येत होते. हेडलाईट वापरायची सवय नसल्याने रस्त्यातले खड्डे चुकवायला जमत नव्हतं. पण येणाऱ्या जाणाऱ्या गाड्यांमुळे काम भागत होत. पाठून गाडी आली कि बरं वाटे पण समोरून गाडी आली कि अप्पर लाईट डोळ्यात जाई आणि चिडचिड होई. अर्धा घाट चढल्यावर मागून ट्रॅक्टरआला. सामान भरलेला ट्रॅक्टर हळूहळू घाट चढत  होता. मला बर वाटलं म्हटलं याच्या लाईटच्या प्रकाशात थोडा वेळ जाता येईल. पण बराच वेळ झाला मागून लाईट येईना. बरं आवाज तर जवळ जवळ येत चाललेला. हा काय प्रकार म्हणून वळून बघितलं तर त्या ट्रॅक्टरला हेडलाईटच नव्हते. मी कपाळावर हात मारला. तो मात्र इतर गाड्यांच्या लाईटमध्ये आरामात चालला होता.  मध्ये मध्ये थांबत पाणी पीत घाट संपलाआणि उरला सुरला चढ संपवूनआम्ही परशुराम क्रॉस केलं. आता जरा दिसायला सुरवात झाली होती.

६.३० वाजून गेल्याने लोट्याला जाणाऱ्या कंपन्यांच्या गाड्या दिसायला लागल्या. आम्ही मध्ये थांबून हेडलाईट काढून ठेवले. एनरझाल तयार करून घेतले. आणि परत पॅडल मारायला सुरवात केली. नाश्ता करायला खेडला जायचे ठरले होते. मध्ये मध्ये चढ उतार पार करत दमायला होत होतं. पण पाणी पित सेल्फी घेत रस्ता पार करत होतो. पीर लोटे, पटवर्धन लोटे पाठी टाकून लवेलला पोहोचलो. आता २० मिनिटात खेड येईल असे श्रीनिवास म्हणाला. मला उत्साह आला,कि आता भोस्ते घाट सुरु होईल आणि या बाजूने तो उतरायचा आहे तेव्हा मस्त वेगात उतरता येईल. पण अर्धा तास होऊन गेला तरी काही भोस्ते घाट यायचा पत्ता नाही. मी आपली,आता उतार सुरु होईल मग होईल म्हणून पॅडल मारतेय पण घाटाचा पत्ताच नाही. शेवटी ४० मिनिटं झालयावर घाट सुरु झाला. आधीच्या रस्त्याला असलेलं कोवळं ऊन इथे नावालादेखील नव्हतं. प्रचंड धुकं होत. दुर्दैवाची बाब म्हणजे आम्ही ज्या स्पीडने परशुराम घाट चढलो त्याच स्पीडने भोस्ते घाट उतरलो. कारण रस्त्यावर असलेले प्रचंड खड्डे. त्यामुळे स्पीड अजिबात नाही उलट ब्रेक दाबत सावकाश सायकल जपतआम्ही घाट उतरलो. भोस्ते घाट म्हणजे खेडची एन्ट्री. घाट उतरल्यावर स्टेशनच्या कडेने खेड शहरात जायला रस्ता आहे त्याने आम्ही आत शिरलो. कडेने रेल्वे ट्रॅक जातो. त्यावेळी तिथून जाणारी रत्नागिरी – दादर पसेंजर ट्रेन दिसली. रस्त्यावरून जाताना अजूनही मला अचानक ट्रेन दिसली तर आनंद होतो. आजही तोच आनंद अनुभवाला. खेड शहरात पोचून एस टी स्टॅन्ड जवळच्या पेठ्यांच्या हॉटेल मध्ये मस्त नाश्ता केला. डोसा, मिसळ, इडली भरपेट खाऊन, बाटल्या भरून घेऊन आम्ही दापोलीच्या रस्त्याला लागलो.

खेड सोडले तेव्हा १०.०० वाजले होते. गारठा कमी होऊन ऊन चढायला सुरुवात झाली होती. खेड – दापोली मध्ये फक्त कुव्याची घाटी लागते. बाकी विशेष मोठे चढ नाहीत असं ऐकलं होतं. निघताना कोळथरे गावी असलेल्या बहिणीला फोन करून येत असल्याचे सांगितले. खेड शहर सोडून गाव भाग सुरू झाल्यावर हळूहळू चढ लागायला लागले. चढ आला कि मग उतार असतो हे गणित डोक्यात पक्क असलेल्या मला इथे धक्काच बसला. इथे चढ झाला कि सपाट रस्ता. परत चढ. ऊन वाढत असल्याने हे चढ चढायला कठीण वाटत होते.

“काय रे किती हे चढ. संपतच नाहीत. ” परत एकदा माझी श्रीनिवास कडे तक्रार ! पण ऐकून घेईल तो श्रीनिवास नाही . तो पण कोकणात आणि पु लं च्या पुस्तकांवर वाढलेला . लगेच मला अंतू बर्व्याच्या स्टाईल मध्ये रिप्लाय दिला ,”हे बघ गोठ्यात निजणाऱ्याने बैलाच्या मुताची घाण येते म्हणून चालत नाही तसंच कोकणातल्या प्रवासात घाट आहेत म्हणून तक्रार चालत नाही.” माझी बोलतीच बंद . आता मी काय आकाशातून नव्हते आले . माझा पण जन्म कोकणतलाच पण हे असे उत्तर श्रीनिवासच देऊ जाणे .

परशुराम घाट चढवता आल्याने इथे मला रस्ता पार करेन असा विश्वास होता. पण एका पुढे एक फक्त चढच लागायला लागले नि मी थकायला लागले. फुरूस गावाच्या अलीकडे मोठा चढ नि नंतर उतार लागला. श्रीनिवासला वाटलं कुव्याची घाटी गेली. पण मला त्या घाटीत असलेला एक दरगा माहित होता. तो न दिसल्याने गेलेला चढ उतार हा घाटी नसून ‘पिक्चर अभी बाकी है’ हे जाणवलं. मध्ये मध्ये पाणी पित पुढे जात होतो. श्रीनिवास कुठेही थांबून देत नव्हता. शेवटी एके ठिकाणी एस् टी ची शेड बघून मी थांबले. खूपच दम लागला होता. मी एवढा असहकार पुकारल्यावर नाईलाजाने श्रीनिवास थांबला. १० मिनिटे पूर्ण थांबलो. मस्त मांडी घालून बसल्यावर जरा बरं वाटलं. 2-2 खारका खाल्लया. वार्याची हलकी झुळूक येत होती. झोपायची इच्छा होत होती पण पुढचा पल्ला दिसत होता. अजून दापोली गाठायची होती.

शेवटी एकदा कुवे गावाची एसटीची पाटी दिसली नि समोर मोठा चढ दिसला. एकदाची ती घाटी आली. तीव्र चढ नि मोठ्ठा यू टर्न अशी ती घाटी. सुरुवातीला थोडा चढ चढल्यावर मागच्यावेळीसारखं मी सायकल हातात घेऊन चालायला लागले. श्रीनिवास सायकलवर बसून घाट चढत होता. पण अचानक यू टर्नवर त्याच्या सायकलची चेन निसटली.  तो चेन लावेपर्यंत मी चढ चढून थांबायच ठरलं. मी एकदाचा सगळा चढ चढून एका घरासमोर झाडाच्या सावलीत थांबले. १०-१५ मिनिटे झाली तरी श्रीनिवास आला नाही म्हणून फोन केला तर चेन जरा जास्तच अडकली होती म्हणाला. चेन मधल्या प्लास्टीकच्या डिस्क/पार्ट मध्ये अडकली होती. तिथल्या तिथे नीट करण्यासाठी तो प्लास्टीकचा पार्ट जाळल्यास चेन लागली असती. पण नेमका लायटर माझ्याकडच्या सामानात होता. श्रीनिवास प्रयत्न करतो म्हणाला. तेवढ्यात माझ्याइथून जाणार्या एका ट्रकवाल्याबरोबर मी लायटर पाठवून दिला. श्रीनिवासला सायकल ठीक करण्यासाठी वेळ गेला. साधारण तासाभराने तो घाटी चढून वर आला. मग मात्र आम्ही भराभर दापोली गाठायची ठरवले. वाटेत फक्त पाणी पिण्यापुरते थांबून लगेच पॅडल मारायला लागलो. माझी खरं तर तासभर विश्रांती झाली होती. पण वाटेतल्या चढ उतारांनी दमझाक होत होती. शेवटी एकदाची दापोली आली. आता निदान ५-१०मिनिटे तरी थांबू अशी श्रीनिवासला विनंती केली. एक शहाळवाला बघून श्रीनिवास थांबला. त्याच्याकडे पोटभर शहाळ्याचं पाणी पिऊन मस्त मलई खाल्ली. १०-१५ मिनिटं शांत बसले. मधूनच कोणीतरी शेजारून जाणारं चौकशी करून जात होत,कुठून आलात? कुठे जाणार? आणि  मग “बाप रे!” चे उद्गार. मग जवळच्याच हॉटेलमधून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या.दुपारी साधारण ०१.३० ला आम्ही निघालो.

कोकण कृषी विद्यापीठाच्या बाजूने कोळथरेला जाण्यासाठी वळलो. परत एकदा चढ एके चढ लागायला सुरवात झाली. या सगळ्या प्रवासात वाईट गोष्ट काय झाली तर फार कमी वेळ मला उताराचा आनंद घेता आला. बरेच वेळा एक तर चढ झाल्यावर सपाट रस्ता, उतार नाहीच  किंवा उतार सुरु होऊन पुढे मोठा चढ असेल तर त्या उतारात हे मोठाले खड्डे, कि उतारात स्पीड मिळायचा नाही आणि मग चढ चढताना दमझाक व्हायची. त्यामुळे माझी चिडचिड वाढत होती. पण काहीच करू शकत नव्हते. श्रीनिवास काही ना काही बोलून माझं मनोधेर्य वाढवत होता नि मी अजून किती चढ आहेत याचा विचार करित समोरचा चढ चढवीत होते. हळू हळू एक एक गाव पाठी टाकतआम्ही पुढे जात होतो. एरवी फॉर्म मध्ये असणारा श्रीनिवासचा स्पीड माझ्याबरोबर अगदीच कमी झाला होता. मी शक्य तेव्हढे चढ चढवत होते. अगदीच नाही जमले तर उतरून चालत जात होते. शिवाय मध्ये मध्ये आजूबाजूची दृश्ये मोबाईलच्या कॅमेरात टिपणे चालू होते. लाडघरच्या इथले सागर सावली हॉटेलआले नि मस्त समुद्र दर्शन झाले. इथे तामस्तीर्थ आहे. समुद्राचे पाणी इथे लाल आहे म्हणतात. अर्थात एवढ्या भर दुपारी आम्हाला कोणत्याही अँगलने ते लाल दिसले नाही. तिथे एकदा एक छोटासा फोटोसेशन चा कार्यक्रम झाला. मग मात्र लाडघरचा उतार आला. इथे माझं समाधान झालं. चांगला मोठ्ठा उतार आणि तोही गुळगुळीत रस्तावरुन. दुपारचे ३ वाजून गेले होते. लाडघर गावाच्या एखाद किमी अलीकडे आम्ही एका पिक उप शेड मध्ये थांबलो. उन्हाने हालत झाली होती. या पिक उप शेड वर मस्त झाड असल्याने गारवा होता शिवाय स्वच्छ होती.आणि भर दुपार असल्याने रस्त्यावर चिटपाखरू नव्हते. जाणाऱ्या येणाऱ्या गाड्यांची आम्हाला तशीही पर्वा नव्हती. मी बूट, ग्लोव्हज काढून तिथल्या कट्ट्यावरआडवी झाले. श्रीनिवास हसायला लागला. पण मी सकाळपासून रपेट करून दमले होते. त्याने तेव्हढयात मला चिडवायला एक सेल्फी काढून घेतलंन. नुसतं आडवं पडून देखील खूप बरं वाटलं. सकाळी ४.३० ला उठलो तेव्हापासून पाठ टेकली नव्हती. दुपारी झोपायची सवय वाईट यावर एक छोटेखानी परिसंवाद झाला.

लाडघर क्रॉस केल्यावर बुरोंडी गाव लागत. लांबूनच बुरोंडीमध्ये असलेला भगवान परशुरामांचा पुतळा दिसायला लागतो.अर्थात मी त्यावरून किती चढ चढायचाय याचा अंदाज केला. मानसिक तयारी केली नि सुरवात केली. इथला रस्ता मात्र प्रचंड खराब होता. येणारे जाणारे लोक कधी आश्चर्याने तर कधी “काय वेडे असतात एक एक ” असा चेहरा करून बघत होती. काही जण अंगठा दाखवून ऑल द बेस्ट म्हणत होती. छोटी मोठी वळणं घेत एक मोठ्ठा यु टर्न घेऊन परत सरळ चढ चढून गेल्यावर एकदाचा भगवान परशुरामांचा पुतळा आला. अर्थात इथे पण थांबून विश्रांती आणि फोटो काढले. कोकम सोडा पिऊन परत फ्रेश होऊन निघालो.

 

अजुन काही चढ संपायचं नाव नव्हतं. “आता फक्त ३ किमी अंतर उरलंय ” – इति श्रीनिवास. मला हे ऐकून जरा धीर आला. चला आता थोडेच अंतर पार करायचे आहे. आणि थोड्याच वेळात कोळथरेला उतरायला मोठा उतार येईल. पण हाय माझ्या कर्मा! समोरचे छोटे छोटे खड्ड्यानी भरलेले चढसुद्धा आता मला मैलभराचे वाटू लागले. चढताना पायात गोळे येतात कि काय वाटायला लागले. श्रीनिवास आपला संपलाच आता १किमी झाले आता २च किमी उरले असं म्हणून धीर देत होता. मध्येच “चढ इथले संपत नाहीत “असं म्हणून माझी चेष्टा करीत होता. परत एकदा मी सायकल उभी करून थांबले. श्रीनिवासने शेवटी विचारलं कि विजय भाऊजींना गाडी घेऊन बोलावून घेऊया का? तू गाडीतून पुढे जा. खरं तर हो म्हणावसं वाटत होत पण लक्ष्य एव्हढ हातातआलेलं असताना फक्त २किमी साठी सोडून द्यायचं जीवावर आलेलं. शिवाय ती चीटिंग झाली असती. आणि माझं मन काही तयार होईना यासाठी.

सुमारे १ किमी गेल्यावर कोळथरेला जायचा फाटा आला. तिथे कोळथरे २.६ किमी लिहिलेलं होत. ते बघितल्यावर माझी प्रचंड चिडचिड झाली आणि अर्थातच श्रीनिवासवर माझी चिडचिड निघाली. बुरोंडी पासून ३किमी आहे असं म्हणत होता हा मगाशी आणि २ किमी रस्ता पार करून परत आपलं इथे २. ६ किमी जायला दाखवतोय. परत एकदा सुरवात झाली. इथे मात्र खड्ड्यांमधून नि दगडांमधून रस्ता शोधावा लागत होता. काही ठिकाणी तर सायकल हातात धरूनच न्यावी लागली. इथे पण परत चढ एके चढ. या चढांनी मी पार कंटाळले होते. शेवटी एकदाचा उतार आला. पण काय ते दुर्दैव इथेही रस्त्याची अवस्था इतकी खराब होती कि सायकल स्लीप होण्याची किंवा रस्त्यावरच्या खडी मुळे पंक्चर होण्याची भीती होती. त्यामुळे तो जवळ जवळ १ किमीचा उतार आम्ही सायकल हातात धरूनच उतरलो. शेवटी एकदाचा तो उतार उतरून आम्ही गावात शिरलो.

ग्रामपंचायतीचा स्वागताचा बोर्ड लागला. त्या बाजूने ताईच घर अगदी लगेच आहे. आणि अशा तर्हेने मजल दरमजल करीत एकदाचे आम्ही कोळथरेला पोहोचलो तेव्हा संध्याकाळचे ५ वाजले होते. चिपळूणला सुरवातीलाच लावलेले रनकीपर ऍप बंद केले. टोटल ७७ किमी सायकलिंग झाले. १०किमी तासाला ऍवरेज झालं. एकूण ८ तास लागले पोहोचायला (मधल्या ब्रेक मध्ये पॉझ करत असल्याने हा वेळ फक्त सायकलिंगचा आहे.) साधारण १० तास लागलेआम्हाला एवढंसं अंतर कापायला.आणि तरीही प्रचंड थकवा आला तो वेगळाच.

लोकं २००किमीच्या BRM  कशा पार करतअसतील काय माहित ? श्रीनिवास एकटा असता तर यापेक्षा निश्चितच खूप कमी वेळेत पोहोचला असता. पण माझ्या बरोबर थांबत थांबत आल्यामुळे त्याच्याही स्पीड वर परिणाम झाला अर्थात त्याचे त्याला काही वाटत नाही (आणि मला पण 🙂 ). सुट्टीतली leisure राईड म्हणूनच आम्ही प्लॅन केली होती. कारण माझ्यासारखील अजिबात सवय नसताना एवढे अंतर पार करायचे हे चॅलेंज होत. पण शेवटपर्यंत सायकल चालविल्याने मला स्वतःला एक समाधान मिळाले. ताईच्या घरी अर्थातच मस्त स्वागत झालं. ताईने एकदम मिठीच मारली. “बाई माझी पोचली ग एकदाची!” अस म्हणून तिने नि मी एकदम हुश्श केलं आणि खळखळून हसलो.

ताईच्या घरी पोचल्यावर लगेच श्रीनिवासने आधी थोडं स्ट्रेचिंग करून घेतलं आणि मग मला मोकळं सोडलन. घरी आल्यावर बूट, सॉक्स काढून मस्त मांडी घालून बसलो. ताईने निरश्या दुधाचा गरम गरम चहा आणलंन. चहा पिऊन होतोय तोवर भाऊजी वडापाव घेऊनआले. दडपे पोहे करूनच ठेवलेले होते. सगळ्यांनीच त्यावर ताव मारला . वर मस्त आईस्क्रीम.अहाहा! आमचं तर जवळ जवळ जेवणच झाल्यात जमा होतं. ताईने पाण्याखाली जाळ करूनच ठेवला होता. मस्तपैकी कढत पाण्याने अंघोळ करून घेतली. गप्पा गोष्टी होईपर्यन्त ताईच्या सासूबाईंनी चविष्ट अशी मुगा-तांदुळाची खिचडी बनवली. उडदाचा पापड, गरम गरम खिचडी, वर ओला नारळ, घराच्या तुपाची छान धार! जी भर गया! पोटभर जेवलो. गप्पा मारायचा मूड असला तरी अंगात त्राण नव्हते त्यामुळे ९ वाजताच झोपायला गेलो. शेजारच्या घरात आमची झोपायची स्वतंत्र व्यवस्था, हवेत आलेला सुखद असा गारवा मग काय दिली ताणून सकाळपर्यंत. कोळथरे हे गाव समुद्रकिनारी आहे. मला खूपच आवडते हे गाव. सकाळी उठून समुद्रावर चालायला जायला जाम आवडत आम्हाला दोघांना. पण कालच्या परिश्रमांनी सकाळी उठायची अजिबात इच्छा झाली नाही. शेवटी ७ वाजता उठून घरात आलो. परत एकदा निरश्या दुधाचा चहा झाला. नाश्ता आटपून अंघोळी उरकल्या. श्रीनिवास भाऊजींबरोबर कलमात चक्कर मारायला गेला तर मी ताईच्या धाकट्या मुलाचा अभ्यास घेत बसले . ११.३० च्या दरम्यान माझा चुलत भाऊ सुमंत वहिनीसह तिथे हजर झाला. आणि मग जेवताना ज्या काय गप्पा रंगल्यात काय सांगू? हात वाळायला लागले तरी ताई, वाहिनी नि मी उठायचं नाव घेत नव्हतो. भाऊजी नि श्रीनिवास चिडवायला लागले. संध्याकाळी मुलांना घेऊन समुद्रावर गेलो. आश्चर्य म्हणजे खुद्द गावातली माणसं फारच कमी वेळा समुद्रावर येतात. निमित्तच लागते त्यासाठी त्यांना. आणि आम्ही केव्हाही गेलो तरी समुद्रावर जायला तयार असतो. किनाऱ्यावर, वाळूत मज्जा केली. सुमंता खूप छान फोटो काढतो त्यामुळे सर्वानी त्याला भरपूर फोटोज काढायला लावले. आज समुद्रावर न भिजण्याचं ठरलं होत. संध्याकाळी मस्त मिसळ भाकरीचा बेत होता. ताईने भाकरी करण्यासाठी एका बाईंनाच बोलावलं होत त्यामुळे त्या एकतर्फी भाकऱ्या करत होत्या आणि आम्ही ताव मारत होतो. मग गप्पा आणि गाण्यांची मेहफिल जमली. भक्ती वाहिनी उत्तम गाते त्यामुळे तिला गाण्याची फर्माईश झाली. भाऊजी तबला वाजवत होते. मग हळूहळू सगळ्यांनीच गाणी म्हटली. सुमंत आणि भक्तीने तर सुंदर द्वंद्वगीत सादर केलं. मजा आली. आणि मग कॉफी पिऊन १ ते १.३० च्या दरम्यान झोपलो.

दुसर्या दिवशी सकाळी चहा पिऊन समुद्रावर पोहायला गेलो. कितीतरी वेळ फोटो काढण्यात, डुंबण्यात गेला. परत जायला वळणार इतक्यात श्रीनिवासला डॉल्फिन दिसल्या सारखा वाटला. आणि थोड्याच वेळात 20-25 डॉल्फिनची झुंड दिसली. मी याआधी कितीतरी वेळा कोळथरेला येऊन गेले होते पण कधी डॉल्फिन बघण्याचा योग्य आला नव्हता. बऱ्याच जणांकडून ऐकले होते कि दिसतात असे मासे त्यात काय? मी पहिल्यांदाच असे समुद्रात डॉल्फिन्स बघत असल्याने मजा वाटली. ते बऱ्यापैकी जवळ होते. गावाकडचे लोक त्यांना ‘गाद्या’ मासे म्हणतात. त्यांना त्याचे काहीच अप्रूप नाही. थोडा वेळ त्यांना मनसोक्त बघून घरी परतलो. तोही दिवस एकदम मजेत गप्पा गोष्टीत गेला.

13 November, 2018

तिसरा दिवस उजाडला.आज कोळथरे ते वेळणेश्वर असे अंतर पार करायचे होते. गूगल मॅप ४५किमी दाखवत होता. मध्ये दाभोळ – धोपावे फेरी बोट होती. धोपावे इथे उतरून वेलदूर – गुहागर मार्गे वेळणेश्वर असा आमचा मार्ग होता. निघू निघू म्हणता म्हणता ०७. ४५ झाले. भावजींनी दोन बाटल्या भरून शहाळ्याचे पाणी दिल होत आणि एक साध्या पाण्याची बाटली होती. सकाळचा चहा पिऊन सर्वाना बाय करून निघालो. जाताना एकदम मस्त वाटत होत. पंचनदी पाठी टाकून दाभोळच्या रस्त्याला लागलो आणि मग सुरवातीला साधा सरळ असणाऱ्या रस्त्याला फक्त चढ एके चढ लागायला लागले. १-१ असा गिअरचा रेशो असूनसुद्धा पॅडल मारायला जड जायला लागलं. तरी नशिबाने ऊन चढलं नव्हतं. सांगताना सुरवातीला सगळ्यांनी थोडासा चढ आणि मग खाली दाभोळ जेटीपर्यंत उतार असच वर्णन केलं होत. पण गाडीतून जाताना लागणारे चढ नि सायकल वरून जाणवणारे चढ यात किती फरक असतो हे कोळथरेला येईपर्यंतच जाणवला होत. तिथल्या मानाने काहीच नाही असं म्हणत चढ चढवत होते. शेवटी एकदाचा दाभोळ जेटीकडे जाणारा रस्ता असा बोर्ड लागला. अजून थोडासा चढ चढला आणि मग मात्र उतार सुरु झाला. इथे मात्र या उतारात रस्ता एकदम नीट होता. क्वचितच एखादा खड्डा होता. त्यामुळे उतार उतरायला खूप मस्त वाटलं. एकदम स्पीड मध्ये केव्हाच उतरून झाला उतार. जेटी वर पोचलो नि दुर्दैवाने ५ मिनिटांसाठी आमची फेरी चुकली. पहिली फेरी ०८. १५ ची असते असं भावजी म्हणाले होते. म्हणजे पुढची तासाभराने ०९. १५ ला असणार असं गृहीत धरून आम्ही  ०९. १५ ची फेरी गाठायला ९.०५ मिनीटांनी पोचलो. पण इथे पुढच्या फेरी मध्ये तासाभराच नसून फक्त ४५मिनिटांचं अंतर होत. त्यामुळे आमची फेरी चुकली. मग काय तिकीट काढून वाट बघत बसलो. समोर धोपावे जेटी दिसत होती. थोड्याच वेळात फेरी बोट हजर झाली. मंगळवार असल्याने बोटीला जास्त गर्दी नव्हती. आरामात सायकल पार्क करून आम्ही जागा पकडल्या.

१५-२० मिनिटात बोट पलीकडच्या धक्क्याला लागली. आता इथून पुढे वेलदूर. इथे श्रीनिवासच्या मित्राचं हॉटेल आहे तिथे नाश्त्याला येतो म्हणून सांगितलं होत. धोपावे ते वेलदूर मोठाच्या मोठा चढ आहे. परत एकदा पॅडल मारायला सुरवात केली. पण इथे मात्र एक झालं कि हा चढ एकदम तीव्र नव्हता. ग्रॅजुएल होता. त्यामुळे चढताना एकमार्गी चढत होतो. श्रीनिवास मधून मधून बडबड करित मला एन्करेज करत होता. पण मी तोंडातून एक अक्षर काढत नव्हते. न जाणो बोलून आणखी दम लागायचा. इथे फेरीत पॉझ केलेले रनकीपर फेरीतून उतरल्यावर चालू करायचे विसरले. त्यामुळे धोपावे ते वेलदूर हे साधारण ३. ५० ते ४ किमी अंतर त्यात रेकॉर्ड झाले नाही. हळूहळू चढ चढत एनरॉन च्या गेटपाशी आलो. इथे समोरच श्रीनिवासचा मित्र निलेश नि माझी मैत्रीण अमिता यांचं पूर्णब्रह्म हॉटेल आहे . भेट प्लस नाश्ता प्लस ब्रेक प्लस  गप्पा अस एकदम झालं. मस्त पोहे आणि कोकम सरबत झालं त्यांच्याकडे. इथून गुहागर ८-१० किमी होतं. याच रस्त्याने जाताना आरे म्हणून गाव लागत. माझी मावशी राहते तिथे. मावशीची मुलगी प्राजक्ता तिच्या मुलासह सुट्टीला आली होती. मग दुपारच्या जेवणाला मावशीकडे जायचं ठरलं. पूर्णब्रह्म मधूनच फोन करून मावशीला कल्पना दिली नि निघालो परत स्वार होऊन. इथे मला भलताच आनंद झाला.  कारणआता पूर्ण गुहागर पर्यंत उतार आणि एनरॉनचा रस्ता असलयाने गुळगुळीत रस्ता. त्यामुळे वेळ कशाला लागतोय. इथे सकाळी आमच्या पाठून निघालेला माझा भाऊ सुमंतने आम्हाला बाईक वरून गाठले. परत त्याला फोटो घेण्याची रिक्वेस्ट केली. आणि त्याने पण लगेच दोघांचा सायकलवरचा एक फोटो क्लिक केलंन. आम्हाला बाय करून तो निघून गेला. आम्ही जरा थांबत थांबत आरे फाटा कुठे आहे बघत होतो. आणि थोड्याच वेळात आलो.

फाट्यावरून थोडंफार आत आहे मावशीच घर हे महित होत पण नक्की किती हे मात्र नव्हतं माहित. बघू पुढे जाऊन, असं म्हणून फाट्यावरून आत गेलो. चढ उतार बरेच होते रस्त्याला आणि शिवाय रस्त्याची स्थिती पण बघण्यालायक नव्हती. १५-२० मिनिट गेल्यावर २ बायका दिसल्या त्यांना विचारलं जोश्यांचं घर कुठे आहे तर त्या म्हणाल्या बरंच पुढे आहे. इथून १५/२० मिनीटांनी ब्राह्मण वाडी लागेल तिथून अजून पुढे. मी उडालेच ऑलरेडी आम्ही जवळ जवळ एक ते दीड किमी तो खडबडीत रस्ता पार करून आलो होतो आणि त्यात अजून साधारण तेव्हढाच रास्ता पार करायचा होता .साधारण १५ मिनिट पुढे गेल्यावर मात्र श्रीनिवास या म्हटलं आता प्राजक्ताला फोन कर. उगाचच्या उगाच पुढे नाही जायचं. नशिबाने फोन एक झटक्यात लागला. तिने आजू १५ मिनिटांचा रस्ता सांगितला. आता माझी मानसिक दमणूक झाली. चढ उताराचा तो खडबडीत रस्ता काही संपत नव्हता नि मावशीच घर काही येत नव्हतं. शेवटी एकदाचा तिचा मुलगा ओम आम्हाला दिसला. पण खरी मज्जा तर पुढेच होती. मावशीच घर रस्त्यापासून ५मिनटे खाली उतरून होत. आणि इथे फक्त पायवाट होती. मी कपाळावर हात मारून घेतला. श्रीनिवास सायकल सोडून खाली यायला तयार नव्हता. मग काय चला! त्या रस्त्यावरून कशा बश्या काही उचलून तर हातात धरून सायकल खाली आणल्या. मावशीच्या घरी सोफ्यावर अंग झोकून दिलं. पाचेक मिनिटं आडवं पडल्यावर बरं वाटलं. कोळथरेला आल्यापासून गोडं पाणी मिळाला नव्हतं. मावशीकडे पोटभर गोडं पाणी पिऊन घेतलं. आम्ही आयत्या वेळी कल्पना दिल्याने मावशी नि ताई स्वयंपाक करण्यात गुंतल्या होत्या. आजूबाजूने रोजची गडी माणसं वावरत होती. पिनड्रॉप म्हणतात तसा सायलेन्स होता तिथे. खरंच खूप बरं वाटलं. आजूबाजूने हिरवीगार झाडी असल्याने आपसूक हवेत गारवा होता. थोड्याच वेळात मावशीने पान मांडलंन. भरपेट जेवून पाण्याच्या बाटल्या भरून घेतल्या. थोडी झाड झुडूप बघितल्यावर श्रीनिवासची उत्सुकता जागी झाली. नाही नाही म्हणता एक जरबेराचा कंद आणि एक जास्वंदीच्या फांदीची सामनात भरती झाली . परत एकदा मागचाच पायवाटेचा चढ चढून आम्ही मूळ रस्त्यावर पोचलो. इथून पुढे परत मेन रस्त्यावर येण्यासाठी साधारण ३ किमी कापायचे होते. भर दुपारच्या २. ३० च्या उन्हात केली सुरवात. इथे मात्र रस्त्याने वैताग आणला. मजल दरमजल करीत मी एकदाची मेन रस्त्याला आले. मग परत गुहागर पर्यंत मस्त उतार लागला.

गुहागर मध्ये एक दोन ठिकाणी हाक मारून वेळणेश्वरच्या वाटेला लागलो. इथे देखील सुरवात चढाने झाली . पण हा देखील ग्रॅजुएल चढ होता. त्यामुळे चढवणे तसं कठीण गेलं नाही. मोडका आगार वरून उजवीकडे वळण घेऊन वेळणेश्वरला लागलो. इथून १५/१६  किमी अंतर आहे. फक्त मध्ये पालशेत गावातला मोठ्ठा चढ लागतो.  बारीक सारीक चढ आहेतच वाटेत. पण श्रीनिवासच्या भाषेत सांगायचं तर ते छोटेसे अपहिल्स आहेत क्लाइम्बस नाहीत. त्याचा बाऊ करायचा नाही. एकदाचे पालशेतला पोचलो. आधी मोठा उतार नि मग वळणावळणाचा तीव्र चढ. पण इथेही उतारात असंख्य खड्डे तर चढ एकदम गुळगुळीत. हा रस्ता पालशेत गावातून जातो त्यामुळे रस्त्यावर थोड्या फार प्रमाणात गर्दी होती. लोक कुतूहलाने बघत होते. काही काही जण २ व्हिलर वरून आमच्या बरोबरीने जात विचारपूस करत होत. तुम्ही हे का करताय? कुणासाठी करताय? विचारात होती . आम्ही तर स्वतःसाठीच हे करतोय असं सांगितलं तर लोक “काय वेडी माणसं असतात एकेक” असा लुक देऊन जात होती तर काही कौतुक करीत चिअर अप करीत होती.

 

पालशेतचा बराचसा चढ चढले मग मात्र दमायला झाल्याने सायकल हातात धरून चालायला सुरवात केली. आणि अगदी ३/४ मिनिटं झाली नि चढ संपला. हुश्श केलं. पाणी पिऊन परत सायकल चालवायला सुरवात केली. आता अगदीच थोडं अंतर उरलं होत. पिंपर फाट्यावरून वेळणेश्वरला जायला वळलो. इथे सगळं उताराचा होता आणि सगळं रस्ता चांगला होता. सटासट पॅडल मारत निघालो. शेवटचा मोठ्ठा उतार लागला. इथे जरा जपून ब्रेक दाबत सावकाश आलो. आणि मग एकदाचे घरी पोहोचलो. घरी गेल्यावर हुश्श झालं. हे आमचं गाव नि आमचं मूळ घर इथे. माझा दीर-जाऊ हृषिकेश नि ऋत्वा इथे राहतात. घरी आल्यावर मस्त गरम पाण्याने अंघोळ केली. मग समोरच्या घरातील अभिषेक – धनश्री नि त्यांची मुलगी इशा यांच्याबरोबर समुद्रावर गेलो. मस्त गप्पा प्लस कांदा भजी नि चहा. घरातच लागून लॉज असल्याने आणि सुट्टी असल्याने लॉजवर गर्दी होती . ऋत्वाशी थोड्याफार गप्पा झाल्यावर जेवून  ०९.०० – ०९.३० वाजताच झोपायला गेलो.

14th Novermber, 2018

सकाळी ०६.०० लाच उठलो. आवरून सायकली घेऊन खाली आलो. मस्त गरम गरम चहा प्यायला. तरी निघे निघे पर्यंत ०८.०० वाजलेच. आज चिपळूण (खडपोली)गाठायचं होत. ६२ किमी अंतर मॅप दाखवत होता. काल उतरलेला रस्ता आज चढायचा होता.अगदी सुरवातीपासूनच चढाची सुरवात झाली. आज काय झालं काय माहित पण सकाळपासून दम लागत होता. प्रत्येक चढांत पाणी पिण्यासाठी थांबत होते. खरं तर ते किती बारीक सारीक चढ होते पण मी मात्र मानसिक रित्या दामले होते कदाचित त्यामुळे मागे पडत होते. श्रीनिवास पुढे जाऊन थांबत होता.आज आम्ही कालच्या पालशेत मार्गे न जाता पिंपर,जामसुत, सुरळ मार्गे जाणार होतो. इथून १० किमी अंतर कमी होतं. मार्गताम्हाने गावात हा रस्ता बाहेर पडतो.वेळणेश्वर पासून साधारण २५ किमी अंतर आहे मार्गताम्हानेला. पण चढ उतार नि बऱ्यापैकी खराब रस्ता यामुळे सायकल चालवणं जिकिरीचं वाटत होतं. त्यात हेडविंड्स त्यामुळे आणखी अडथळा येत होता. हळूहळू एक एक गाव मागे टाकत निघत होतो. श्रीनिवास चिअर अप करत होता. पण मला खूपच दमल्यासारखं वाटत होत. एका क्षणी वाटलं कि एखादी गाडी बघावी नि सायकल टाकून सरळ चिपळूण गाठावं. पण मन राजी होत नव्हतं. बघू करूया जमेल तेव्हढं म्हणत होते. तेव्हढ्यात गावातल्या गोपाळ दादांची गाडी पास झाली. श्रीनिवासने गाडीने जाण्याच्या प्रस्तावाला नकार देऊन सायकल रेटत राहिले. आणि मजल दरमजल करीत एकदाचं मार्गताम्हाने गाठलं. इथला फेमस स्नेहांकित वडापाव पार्सल घेतला आणि मग एक बरीशी पिकअप शेड बघून खायला थांबलो. जरा विश्रांती झाली. बर वाटलं.

या रस्त्याला लागल्यावर मात्र मला एकदम फ्रेश वाटलं. जरी चढ उतार असले तरी मगाचच्या रस्त्याला जी दमणूक झाली ती नाही वाटली. कदाचित चांगला रस्ता हे कारण असू शकेल. खाऊन झाल्यावर परत सुरवात केली सायकल चालवायला.  इथे आता रामपूरची घाटी उतरायची होती. चांगल्या रस्त्यावरून स्पीड मध्ये घाटी उतरायला मजा आली. क्वचितच रस्त्यात खड्डा त्यामुळे सगळा उतार एकदम स्पीड मध्ये उतरायला मिळाला. पुढे गणेशखिंडीचा चढ होता. पण हा चढ फार तीव्र नसल्याने चढवता आला. चढ चढून आल्यावर एका टपरीवर कोकम सरबत प्यायलं. मस्त माठातलं थंडगार पाणी पिऊ शांत झाले. बाटल्यांमध्ये पाणी भरून घेतलं. आता चिपळूण अगदी हाकेच्या अंतरावर होत. तिथून खडपोली १० किमी वर. साधारण १५ किमी अंतर अजून शिल्लक होत. पण आता दम न लागता घरी पोचायचं म्हणून उत्साह आला. इथे परत थोडा उतार सुरु झाला. रस्त्याला असणारे बारीक सारीक खड्डे जाणवत होते पण दुर्लक्ष करीत होतो. आता ०२.३० वाजत आले होते. आमची रोजची जेवायची वेळ टळून गेली होती पण काहीतरी खाणं मस्ट होतं. मग बाजारात एन्ट्री केल्यावर परत आतल्या रस्त्याने मुंबई गोवा हायवेला लागलो नि डॉमिनोज गाठलं. मस्त पिझ्झा खाल्ला आणि शेवटचे १० किमी पूर्ण करायला सज्ज झालो.

आता अगदी रोजचाच रस्ता. इथले अगदीच छोटे छोटे चढ उतार ओळखीचे असल्याने अंतर पटापट कापत होतो. थोड्याच वेळात घरी पोहचलो. बाबा वाट बघत होतेच. खरं तर सकाळी ०८.०० ला निघालेलो आम्ही घरी दुपारचे ०४.०० वाजता पोहोचलो. इतर ग्रुप वरचे लोकांचे रेकॉर्ड बघता आम्ही या ६२ किमी साठी घेतलेला वेळ हा काहीतरीच जास्त होता. पण काही इलाज नव्हता. रोजचे सायकलिंग करून स्पीड वाढवणे हाच एक उपाय आहे त्यावर.

या सगळ्या प्रवासात काही गोष्टी ठळकपणे जाणवल्या. आजूबाजूने जाणारी बरीच जणं “काय एकेक वेडे असतात” असा लुक देऊन जात होती. खूप कमी जण होती जी प्रोत्साहन देत होती. काही जण उगाच चौकशी करत होती तर काहींना खरंच उत्सुकता होती. एक गोष्ट खूप जाणवली ती म्हणजे आपल्याच लोकांचे गैरसमज. आमचा बराचसा प्रवास हा खेड्यातून झाला. त्यांच्या नजरेला असे सायकल चालवणारे क्वचित का होईना पण दिसतात. पण त्यांचा पक्का समज असा होता कि हे सगळे सायकल चालवणारे हे परदेशीच असतात. आपल्या इथली लोक काही असल करणार नाहीत. सहज रस्त्यावरून जाणाऱ्या मुलानी कितीतरी वेळा “ओ फॉरेनर!”अशी हाक मारली तर कधी “ए ते बघ फॉरेनर सायकलने चालले” करीत आणखी मुलाना गोळा केले. मला खूपच आश्चर्य वाटायचं असं का होतंय. आमच्या दोघांपैकी कोणीही परदेशी वाटेल असं दिसायला नाही. पण मग लक्षात आलं कि मी ट्रॅक पॅन्ट शर्ट, डोक्यावर हेल्मेट, डोळ्याला गॉगल त्यामुळे माझा रंग कुठेही दिसत नव्हता तसाच श्रीनिवासच. तसही कोणी निरखून बघण्याएवढं जवळ यायचं नाही लांबूनच हाक मारायचे. एकदा तर मी चढ चढताना दमून पाणी प्यायला उतरले तर दुसऱ्या बाजूने जाणाऱ्या मुलांनी “ओ फ़ॉरेनर! हाऊ आर यु?” असं विचारलं. पहिली दुसरीची पोर होती. शाळेत शिकवलेलं एकमेव वाक्य त्यांनी उच्चारलं. मला जाम मजा वाटली त्यांची. मी त्यांना म्हटलं मला मराठी येत तर त्यांना इतकं आश्चर्य वाटलं. गॉगल काढला नि म्हटलं अरे मी इथलीच चिपळूणचीच! आणि मग त्यांना स्वतःच्या गैरसमजाच हसू आवरेना. मला ऑल द बेस्ट करून निघून गेली. पण वाईट याच वाटलं कि हा अनुभव खूप ठिकाणी आला. काही जण तर अरे सायकलिस्ट आहेत म्हणून उत्साहाने जवळ येऊन चौकशी करत आणि “अरे हे तर इथलेच आहेत” हे समजल्यावर निराश होऊन चेहरा पाडून पुढे जात. या गोष्टीचा मला प्रचंड राग आला.

दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या नातेवाईकांत निर्माण झालेलं आश्चर्य. श्रीनिवास आधीपासून सायकल चालवतो. मी देखील सायकल चालवायला सुरवात केली. श्रीनिवासच्या नादाने नव्याचे नऊ दिवस ते असणार असं बऱ्याच जणांनी गृहीत धरलं होत. पण मी एवढी मोठी ट्रिप करेनअसं खरं तर खुद्द मलाही वाटलं नव्हतं. प्रत्यक्षात त्या त्या जागी पोचल्यावर मात्र सगळ्यानकडून कौतुक झालं. गृप वर रोजचे अपडेट टाकत होते तिथूनसुद्धा कौतुकाचे मेसेज येत होते. त्यामुळे मनातून सुखावत होते. ते देखील एक प्रकारचे प्रोत्साहन होते. बरं वाटत होत.

अनेक जण करत असतील पण माझ्यासाठी तरी मी इतक्या वर्षांमध्ये काहीतरी वेगळं करीत होते नि त्याच मला समाधान होतं. श्रीनिवास कायम मला धीर देत होता तुला जमणार म्हणत होता आणि मी ते जमवलं. भले मी त्यासाठी वेळ जास्त घेतला. पण मी कुठेही इतर मदत न घेता सगळा रस्ता सायकलने पार केला याच समाधान खूपच आहे. याच श्रेय नक्कीच श्रीनिवासला जातं. माझी क्षमता माझ्यापेक्षा तो जास्त जाणून आहे आणि याचं मला खूप आश्चर्य वाटत आणि कौतूक सुद्धा.

 

धनश्री

27-11-2018

 

48 thoughts on “यूं ही चला चल राही….

 • __/\__ .ग्रेट प्रवासाच ग्रेट वर्णन . बाकी काही सुचत नाही

 • Ek number. Dhanashrine mast lihile aahet. Tujhya swabhav agadi vyavasthith tipla aahe. Yevdhe challenge par kelyabaddal tichehi abhinandan.

  Asech cycle varun firat raha aani aaple aayushya samruddha karat raha. Aamha mumbaikarana tumche kautuk, nahitar aamchya nashibatli train kahi sutat nahi. Jeete raho, cycling karte raho……

  Abhimaan aahe ki iron-man sharyatit nahi gelat agadi tari koknat cycle chalavne he iron-man yevdhech kathin.

 • Dhanashri blog chhan lihila aahe. Tujhe abhinandan aani shri che kautuk. Tumhi agadi iron-man saryatit aata bhag ghet naslat tari je karat aahat te kharach kautuk karnyasarkhe aahe. Shrichya swabhavatle pailu chhan aale aahet aani cycling che adventurehi khup mast padhatine mandle gele aahe.

  Tumhi asech pravas karat raha hi sadiccha. Khup khup fira aani aamhala ase chhan-chhan blogs vachayala dya. Mumbai kar aslyamule aani tyatun rojcha pravas aslyamule konala tumche kautuk vatnaar nahi pan koknat rahun asehi kahi karta yeu shakte he tumhi dakhvun dilet. Typically, lokanchi firaychi avad hi simla, kulu, manali kinva Kashmir aani aaj kal Thailand-Malaysia hyachya palikade jaat nahi. Cycling karne ha khup chhan experience aani vyayam aahe. Cycling kelyavar dusra kuthlahi vyayam karaychi garaj nahi.

  Khara sangayche mhanje mala hi tumhi aata inspire karat aahat cycle chalavnyasathi. Ikde mala kiti Jamel te sangta yet nahi tarisuddha cycle ghyachi iccha manat parat ekda nirman jhali aahe. Cycle gheun firave aani mast photo kadhavet.

 • Fantastic journey and excellent narration Dhanashree. If possible, make a little feature rich post (some more pics and maybe short 2 min. video clips) esp. while narrating the interesting . 2 distinct benefits:
  1) People are more hooked to visual content esp. in case of stories which are not a everyday phenomena. I would have loved to see either of you covering that off-road trail at Are. Not a everyday sight in Cities.

  2) Non-Marathi people can get a slightly better idea of the narrative

  Both of you ROCK!!! Keep on pedaling.

  Best regards,
  Gaurav

  • Thanks Gaurav! yeah.. We will make the changes and try n get it in English!
   I have some video footage but, I find editing difficult than riding 😉

 • सुंदर आणि सहज लिखाण…. डोळ्यासमोर चित्र उभं केलंस वहिनी.. मलाही खडपोली-चिपळूण-कोळथरे-वेळणेश्वर-चिपळूण-खडपोली प्रवास केल्यासारखं वाटलं. दोघांचंही हार्दिक अभिनंदन. श्रीनिवास दादा, लेख सागर मध्ये दे.. पुन्हा एकदा दोघांचं अभिनंदन.. पुढचं लक्ष्य कन्याकुमारी…….👍👍

 • धनू खूप मस्त लिहील आहेस
  हॅट्स ऑफ़ दोघांनाही…
  keep it up 👍👍👍

 • वा उत्तम कार्य… व्यसन असं असावं
  ज्यात मानसिक समाधान,ऊर्जा आणि आनंद मिळेल..
  तुम्ही दोघांनी अजून नवे नवे विक्रम करत चला…
  आम्हा सर्वांकडून हार्दिक शुभेच्छा

 • छान, एका दमात वाचून काढले, म्हणजे मध्ये थांबताच आले नाही.
  Good travelogue, the language is visual, you can even start a YouTube channel which will have a different set of viewers. I personally enjoyed reading and it was easy for me to relate to as I have been in that area . Think form the angle of people who have never visited kokan. Will not only spread your readers base but will attract many to kokan tourism in general and cycling in particular. आता पुणे ठरवा आणि माझ्याकडे मुक्कामाला या

 • सर !!!!तुम्ही ग्रेट आहात हे आम्हला माहीतच होतं… पण मॅडम तुम्ही पण ग्रेट आहात… 😀
  Cyclingची सवय नसताना एवढा मोठा पल्ला गाठणं खुपचं मोठ्ठं काम…👏
  very well done!!!👍
  मला तर हा तुमचा अनुभव वाचतानाच दमछाक झाली बुवा..😥
  एवढा मोठा पल्ला गाठायचा तो पण cycle ने या कल्पनेनंच माझ्या पायात गोळे आले…😜
  त्यामुळे हा तुमचा अनुभव वाचूनच मी पण एवढं cycling केल्याचं समाधान मानून घेते…😆
  पण खरंच खूप मस्त अनुभव आणि खूप मस्त मांडलं आहे की हे वाचताना माझ्या ही डोळ्यासमोर सगळं चित्र उभं राहत होत..👌
  All the best..!!!👍😊

 • Dhanu Mastach…. Sagal kokan darshan jhal.. Visual trip. Keep it up yaar.. U both r inspiring us to do cycling again… School chi Khup athavan ali.. Apan nehmi shaletun yetana Ani jatana cycle ne ektra jayacho…. Wow yaar… Parat cycling Karavas watatay…

 • भन्नाट, घरचाच गुरु भेटलाय , भाग्यवान आहात . सायकलिंग सुरु ठेवा, परत याच सिझन ला हीच राईड करा एकदा . प्रत्येक पॅडल तुमचा आत्मविश्वास वाढवेल .
  शुभेच्छा.

 • भारीच आहात श्रीनि व सौ श्रीनि
  खास करुन परशुराम , दाभोळ चे घाट आठवले व सायकल कशी रेटलीत हे जश्ट इमॅजिन केलं.

  कीप इट अप !!!👍

  लेकरू कुठं होतं तेंव्हा ??

 • इतक छान अनुभव कथन आहे की आम्ही ही ह्याच एक भाग असल्यासारखं वाटतंय.

 • मस्त रे श्रीनिवास आणि वहिनी.. सुंदर लिहिले आहे.. या आता डोंबि व्हॅलीला.. आमच्याकडे सायकलवर 🙂

 • भारीच , मजा अली वाचायला आणि शक्ती मिळाली सायकल चालवायला 🙂

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *