आमची म्हैस…

हा फ़ोटो बघितला आणि माझं मन १०-१५ वर्ष मागे गेलं. आमच्याकडे वेळणेश्वरला घरी गाई म्हशी होत्या. त्यात एक म्हैस होती. काळी भोर, कपाळावर चंद्रकोर, गुबगुबीत, कोचेरी शिंग असलेली! बिचारीच्या शेपटीला infection झालं असल्याने तिची शेपटी कापून टाकावी लागली होती.

ही Dober म्हैस सहजासहजी कुणाला हातही लावून द्यायची नाही पण मी कितीही मस्ती केली तरी शांत असायची. तिच्यासाठी डोंगर कडयावर जाऊन हिरवंगार गवत कापून आणायचो. मस्तपैकी शेतात चरत असताना मी बगळ्यासारखा तिच्या पाठीवर बसून फ़िरायचो. तिलाही त्याची गंमत वाटत असावी. एकदा कधीतरी आईचा डोळा चुकवून घरातल्या पोळ्यासुद्धा तिला खायला घातल्या आहेत आणि नंतर पोटभर मार खाऊनही दिवसभर उपाशी राहिलो आहे. 🙂

आता शेतही नाही आणि गाई म्हशी सुद्धा नाहीत पण अजूनही तिचे टप्पोरे डोळे दिसतात, तिला खायला घालताना तिच्या खरखरीत जिभेचा हाताला होणारा स्पर्श अजूनही जाणवतो आणि एखाद दिवशी मी नसेन तेव्हां आईने कांही खायला द्यायचा प्रयत्न केला तर नेहमीचं माणूस दिसत नाही म्हणून कांही न खाता निघून जाणारी ती म्हैस दिसते…

प्राण्यांची वेडी माया ही अशीच असते. प्राणी मित्रांनाच हे bonding चटकन कळेल.

श्रीनिवास गोखले
०१-०८-२०१४

14 thoughts on “आमची म्हैस…

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *